आजकाल ऑनलाईन गेम्स खेळून सहज पैसे कमावण्याबाबत टीव्ही आणि इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या भ्रामक जाहिरातींमुळे लोक त्यात अडकत आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या लोभापायी आपले कष्टाचे पैसे गमावत आहेत. असंच एक धक्कादायक प्रकरण उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील खटीमा येथून समोर आलं आहे. एका हॉटेलमध्ये लष्कराच्या एका जवानाला जिवंत काडतुसं आणि रायफलसह पकडण्यात आलं. हा जवान आसाममधील आर्मीच्या कँपमधून पळून खटीमा येथे पोहोचला होता.
खटीमा कोतवाली पोलिसांनी एका हॉटेलमधून इन्सास रायफल आणि ६० जिवंत काडतुसं घेऊन आसाम आर्मी कॅम्पमधून पळून गेलेल्या जवानाला पकडलं आहे. सूरज चंद्र जोशी (वय २५ वर्षे) असं या जवानाचं नाव असून तो चंपावत जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. आसाममध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे जवानाला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि तेथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
खटीमा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवान सध्या आसाममध्ये तैनात होता.nजवान ड्युटीवर असताना आर्मी कँपमधून शस्त्रं घेऊन खटीमा येथे पळून गेला होता, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. रायफलसह जवानाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी आसाममधील आर्मी कँपच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. आसामच्या बोरपठार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवानाला अटक केल्यानंतर आयबी आणि एलआययूने त्याची चौकशी केली. खटीमा पोलिसांचे कोतवाल, मनोहर सिंह दसौनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशीत जवानाने सांगितलं की, त्याच्यावर बँकेचं कर्ज आहे आणि ऑनलाईन गेममध्ये पैसेही गमावले होते, त्यानंतर तो मानसिकरित्या अस्वस्थ झाला होता. त्याला कोणाचं नुकसान करायचं नव्हतं. त्याला होत असलेल्या मानसिक त्रासामुळे तो कॅम्पमधून पळून आला.