Bulli Bai App Case: 'बुल्ली बाई अॅप' प्रकरणी मुंबई पोलिसांनी बंगळुरूतून एका २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव विशाल कुमार (२१) असं असून त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुल्ली बाई अॅप प्रकरणामागची मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड उत्तराखंडमध्ये राहणारी एक महिला आहे. या महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघंही एकमेकांना ओळखत होते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती.
पोलिसांनी याप्रकरणात आणखी एका आरोपीला देखील ताब्यात घेतलं आहे आणि चौकशी सुरू आहे. २१ वर्षीय विशाल कुमार याला बंगळुरूतून अटक केल्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे.
असा झाला खुलासा...१ जानेवारी रोजी जेव्हा अनेक मुस्लिम महिलांनी त्यांचा फोटो बुल्ली अॅपवर अपलोड झालेला पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. GitHub प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होस्ट करण्यात आलेल्या अॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो वापरले जात होते आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार सुरू होता. विशेषत: यात मुस्लिम महिलांना लक्ष्य केलं जात होतं. ज्या महिला सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असतात अशा महिलांना लक्ष्य करुन त्यांच्यावर बोली लावण्याचा प्रकार बुल्ली बाई अॅपवर सुरू होता. यात महिला पत्रकार, कायकर्ता आणि वकील यांना लक्ष्य केलं जात होतं. याआधी सुल्ली डील्स नावाचं अॅप देखील सुरू होतं. बुल्ली अॅप हे त्याच अॅपचं दुसरं रूप होतं.
शीख समुदायाशी प्रकरण जोडण्याचा प्रयत्नमुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल कुमार यानं जाणूनबुजून 'खालसा सुपरमेसिस्ट' नावानं अकाऊंट सुरू केलं होतं. ३१ डिसेंब रोजी त्यानं अकाऊंटचं नाव शीख समुदायाशी संबंधित असं ठेवलं. पण या अॅपचा शीख समुदायाशी कोणताही संबंध नाही. पण आरोपीनं समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून असं भासवण्याचा प्रयत्न केला होता.