नात्याला काळीमा! मुलगाच निघाला पेट्रोल पंप मालकाच्या हत्येचा मास्टरमाइंड, 'असा' रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 11:07 AM2024-02-04T11:07:59+5:302024-02-04T11:15:18+5:30
नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
उत्तराखंडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुरकी येथील पेट्रोल पंप मालक जोगेंद्र यांच्या हत्येचे प्रकरण उघड करताना पोलिसांनी मृताच्या मुलासह सहा आरोपींना अटक केली आहे. हत्येचा कट जोगेंद्र यांच्या मुलानेच रचला होता आरोपींकडून घटनेत वापरलेली हत्यारं, एक कार आणि बाईक जप्त करण्यात आली आहे. एसएसपी यांनी या घटनेचा तपास करणाऱ्या टीमला 10,000 रुपये आणि IG ला 15,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
रुरकी गंगनहर कोतवाली येथील घटनेचा खुलासा करताना एसएसपी हरिद्वार प्रमेंद्र डोवाल म्हणाले की, 27 डिसेंबरच्या रात्री पनियाला रोडवरील पेट्रोल पंप मालक जोगेंद्र चौधरी यांची काही तरुणांनी त्यांच्या कार्यालयातच गोळ्या झाडून हत्या केली होती. पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वेगवेगळी टीम तयार करण्यात आली होती, ज्याद्वारे सीसीटीव्ही फुटेज, पाळत ठेवणे आणि माहिती देणारे आदींच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.
एसएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात निष्पन्न झालं आहे की, मृताचा मुलगा अनुराग हा अंमली पदार्थांचे व्यसन करत असून त्याचे गुन्हेगार तरुणांशी संबंध आहेत. नोएडा येथील रहिवासी असलेला गुन्हेगार प्रिन्स खटाना याची अनुरागशी मैत्री असल्याचं निष्पन्न झालं. 27 डिसेंबरला तो रुरकीला आला होता. यानंतर पोलिसांनी प्रिन्स खटाना याला अटक केली. अनुरागच्या सांगण्यावरून जोगेंद्रची हत्या केल्याचं प्रिन्सने पोलीस चौकशीत सांगितलं.
प्रिन्सच्या माहितीवरून पोलिसांनी तिन्ही शूटर्सना नोएडा येथून अटक केली. यासोबतच आरोपींना बाईक पुरविणाऱ्या अंशुलला अटक करण्यात आली. पुराव्याच्या आधारे मृताचा मुलगा अनुराग याला अटक केली असता, अनुरागने पोलीस चौकशीत सांगितलं की, तो व्यसनी आहे आणि त्याची अशा तरुणांशी मैत्रीही आहे. त्याचा खर्च भागवण्यासाठी त्याला घरातून पैसे चोरावे लागले.
आरोपीने सांगितलं की, वडील अंमली पदार्थाच्या सवयीमुळे आणि अशा तरुणांशी मैत्री करण्यासाठी अडवायचे आणि मारहाण करून घरात कोंडून ठेवायचे. यानंतर अनुरागने वडिलांच्या हत्येचा कट रचला. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता माझ्या नावावर होईल आणि त्या संपत्तीतील काही रक्कम तो वेळोवेळी प्रिन्सला देत राहील. त्यानंतर कार्यालयात बसलेल्या जोगेंद्र यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.