उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीच्या डोक्यात चावी ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. रुद्रपूरमधल्या सिटी पेट्रोल युनिटनं (सीपीयू) एका तरुणाच्या कपाळावर चावी ठोकली. हा अमानवीय प्रकार पाहून अनेकांना संताप अनावर झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली.सिटी पेट्रोल युनिटला पोलीस मित्र म्हणून ओळखलं जातं. मात्र पोलीस मित्रांच्या कृत्यामुळे सध्या त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. सीपीयूमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांनी रुद्रपूरमधल्या रम्पुरा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या दुचाकीची चावी तपासणी दरम्यान काढून घेतली. यानंतर पोलिसांनी ती चावी त्याच्याच कपाळावर ठोकली. यामुळे एकच गोंधळ झाला. त्यानंतर स्थानिक आमदार राजकुमार ठुकराल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीपीयूला रुद्रपूरमधून हटवण्याची मागणी केली. पोलिसांचा अमानवीपणा दाखवणारा प्रकार घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली. या घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिसांकडून सर्वसामान्यांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर मग त्यांना मित्र का म्हणायचं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
धक्कादायक! पोलिसानं तपासणीदरम्यान तरुणाच्या कपाळावर ठोकली चावी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 5:50 PM