वडोदरा – १, २ नव्हे तर तब्बल १०० पोरींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करणारा युवक पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर या युवकाने मागील ८ वर्षापासून मेट्रोमोनियल साइटच्या माध्यमातून मुलींना फसवत आहे. या प्रेमभंग झालेल्या प्रियकराने केवळ वडोदराच नाही तर देशातील विविध भागात राहणाऱ्या मुलींना प्रेमात अडकवून त्यांची आर्थिक लूट केली आहे.
वडोदरा पोलिसांनी या आरोपी युवकाला अटक करून कोर्टात हजर केले. तिथून कोर्टाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून या युवकाची आणखी सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांना मेट्रोमोनियल साईटवर फसवणूक झालेल्या तक्रारी मिळाल्या. त्यानंतर पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेमार्फत चौकशी केली असता एकप्रकारे मॉड्स ऑपरेंडी समोर आली. पोलिसांनी चौकशी केली असता रोहित सिंह नावाच्या युवकाची माहिती सापडली.
वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित सिंहने संपूर्ण देशातील १०० हून अधिक मुलींना जाळ्यात अडकवले. प्रेमात विश्वासघात मिळाल्यानंतर त्याने मुलींना फसवण्याचा खेळ सुरू केला. मागील ८ वर्षापासून तो मुलींना ब्लॅकमेल करत आहे. आरोपीने यातून आर्थिक लूट करून लाखोंची कमाई केली. तो नाव बदलून प्रोफाईल बनवत होता. त्यात स्वत:ला जज, डॉक्टर, इंजिनिअर आणि उद्योगपती असल्याचे दाखवायचा. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने सोशल मीडियावर महागड्या कारसह फोटोही पोस्ट केले आहेत. यानंतर महिलांच्या संपर्कात येऊन खासगी फोटोही घेत त्यांना ब्लॅकमेल करत होता. भोपाळमधून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली.
प्रेमात धोका, मुलींना फटका
चौकशीत आरोपी युवकाने फसवणुकीची कबुली दिली आहे. प्रेमात धोका मिळाल्यानंतर मी हे करायला सुरुवात केली असं आरोपी म्हणाला. रोहित सिंह एका मुलीवर प्रेम करायचा. त्या मुलीवर त्याने जवळपास दीड लाख रुपये खर्च केले होते. परंतु पुढे जाऊन मुलीने काही वाद काढून त्याला सोडून दिले. त्यामुळे रोहित सिंह नाराज झाला होता. मनात बदल्याची भावना होती. त्यामुळे तो मुलींना फसवून त्यांची आर्थिक लूट करायचा. आरोपी शिक्षित असून त्याला तंत्रज्ञानातील बरेच काही माहिती होते. त्याचाच फायदा घेत आरोपीने मेट्रोमोनियल साईटवर मुलींना जाळ्यात फसवू लागला. त्यानंतर मुलींना धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटू लागला.