मुंबई - राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवडय़ात शुक्रवारी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) अटक केली होती. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब, स्फोटके, रिव्हॉल्व्हर, स्फोटके बनविण्याचे साहित्य आणि अन्य शस्त्रसठय़ासह सिमकार्ड, मोबाईल, बॉम्ब तयार करण्याची माहिती, हार्डडिस्क, डायरी, इंनोवा गाडी आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या. आज न्यायालयात एटीएसने तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करत तिन्ही आरोपींच्या चौकशीतून उजेडात आलेली माहिती आणि तपासातील प्रगतीची माहिती आज न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने या तिघांचीही पोलीस कोठडी २८ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. बॉम्ब, स्फोटके बनविण्याचे साहित्य, शस्त्रसाठय़ाचा संभाव्य वापर, कट, आरोपींचे कनेक्शन, साथीदार ज्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. याबाबत एटीएसने गेल्या आठ दिवसांत तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली. नालासोपारा, औरंगाबाद, सोलापूर पुण्यात छापे घातले. तसेच आरोपींशी संबंधित अनेकांची चौकशी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही आरोपींची चौकशी करण्यात आल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. तसेच आज दुपारी नालासोपारा येथे वैभव, पुण्यातील सुधान्वाच्या घरी आणि सोलापूर येथे एटीएसने छापेमारी केली आहे.
वैभव राऊतसह अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 9:14 PM