मुंबईत नवजात बालकास पोलिसांनी वाचवल्याची एक घटना समोर आली आहे. घाटकोपरमधील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यात वाहून जात होते. ते मांजरींनी पाहिले आणि त्यांनी आवाजाने आजूबाजूच्या लोकांना जमा केले. यानंतर जमलेल्या नागरिकांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नवजात अर्भकाला नाल्यातून सुखरूप बाहेर काढले आणि रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला.
मुंबई पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. “एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकास मिळाली होती. नाल्याजवळील मांजरींनी ओरडून गोंधळ केल्याने संबंधित नागरिकांच्या नजरेस नाल्यातील बालक पडले होते. बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुखरूप, सुरक्षित आहे”, अशी माहिती देणारं ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.