जळगाव : अपघातग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्याचा राग अनावर होऊन रुग्णासोबत आलेल्या लोकांनी सहयोग क्रिटीकल केअर सेंटर या रुग्णालयात गोंधळ घालून आयसीयु कक्षात तोडफोड करुन डॉक्टरांवर हल्ला केल्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी रात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द दंगल, बेकायदेशीरपणे प्रवेश करुन हल्ला तसेच वैद्यकिय सेवा व्यक्ती आणि वैद्यकिय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध) अधिनियम २०१० चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील विटनेर येथील विनोद भिमराव वानखेडे यांचा बुधवारी रात्री चिंचपुरा गावाजवळ अपघात झाला होता. नातेवाईक व काही जवळचे लोक त्यांना घेऊन शाहू नगरातील सहयोग क्रिटीकल केअर सेंटर या रुग्णालयात घेऊन आले. तेथे डॉ. विनोद गोविंदराव किनगे (५४,रा.शाहू नगर) व डॉ.प्रकाश सुरवाडे यांनी तपासून रुग्णावर प्राथमिक उपचार केले. रुग्णाची नाडी लागत नव्हती व बीपीही लागत नव्हता. त्यामुळे डॉ.किनगे यांनी रुग्णाला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात नेत असताना काही जण माघारी फिरले व डॉ.किनगे यांच्यावर संताप व्यक्त करुन गोंधळ घातला. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात विनोद वानखेडे यांना मृत घोषीत केल्यानंतर संतापात आणखी भर पडली. नातेवाईकांनी आयसीयु कक्षात जावून काचा व इतर तोडफोड करुन डॉ.किनगे यांची कॉलर पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ईश्वर महाजन, महेश चव्हाण अशांनी त्यांची सुटका केली. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजता डॉ.विनोद किनगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात चार ते पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णाचा मृत्यू झालेला असल्याने हल्ला करणाऱ्यांची नावे निष्पन्न करता आली नाहीत, त्यामुळे कोणाला अटक करता आली नाही. रुग्णासोबत आलेले व्यक्ती, तोडफोड करणारे यांची माहीती काढून नावे निष्पन्न केली जातील, त्यानंतर अटकेची कारवाई होईल. सीसीटीव्ही फुटेज तपासून चेहरे स्पष्ट करता येतील. -गणेश बुवा, सहायक पोलीस निरीक्षक