यवतमाळ : वडिलांऐवजी दुसऱ्याचाच मृतदेह दिल्याने अज्ञातांकडून येथील शहा हाॅस्पिटलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तोडफोड करण्यात आली. ॲड. अरुण गजभिये यांचा येथील हाॅस्पिटलमध्ये शनिवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी मोक्षधामात पोहोचले. तेथे मृतदेह उघडून बघितला असता, तो दुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईक हाॅस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे शुभम शेळके याने सदर मृतदेह त्याचे वडील दिगांबर लक्ष्मणराव शेळके यांचा असल्याचे सांगितले. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह सोपविल्यामुळे संतप्त होत ॲड. गजभिये यांच्या नातेवाईकांनी डाॅक्टर व उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारत रुग्णालयाची तोडफोड केली. निवृत्त सहायक फाैजदार दिगांबर शेळके यांचाही शनिवारी रात्री कोरोनाने मृत्यू झाला. मात्र, बिलाची रक्कम जमा न केल्याने त्यांचा मृतदेह रुग्णालयाने दिला नाही, असा आरोप मनीषा दिगांबर शेळके यांनी केला.
मृतदेह आम्ही दिलाच नाही - डाॅ. सारिका शहा याप्रकरणी ॲड. गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह रुग्णालयाने दिलाच नसल्याचे डाॅ. सारिका शहा यांनी सांगितले. यामुळेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रुग्णालयाने जर ॲड. गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिला नसेल, तर तो त्यांनी कसा नेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डाॅक्टरवर गुन्हा दाखल कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह देऊन निष्काळजीपणा केल्याप्रकरणी डाॅ. महेश शहा यांच्यावर अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ललित अरुण गजभिये याने याप्रकरणी तक्रार दिली. शुभम दिगांबर शेळके हाही पोलीस ठाण्यात हजर होता. दोघांचीही तक्रार एक करून गुन्हे नोंदविले गेले.