उत्तर प्रदेशातीलवाराणसीसह आसपासच्या परिसरात दहशत निर्माण करणारा वॉण्टेड गुंड दीपक वर्मा याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी एका चकमकी दरम्यान दीपक वर्मा याला ठार करण्यात आलं आहे. दीपकवर जवळपास दोन डझनहून अधिक गुन्ह्यांची नोंद होती. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. इतकंच नव्हे, तर त्याच्यावर एक लाख रुपयाचनं इनाम देखील जाहीर झालेलं होतं.
वाराणीच्या चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपकचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. एन्काऊंटरमध्ये जखमी झालेल्या दीपक याला पोलिसांनी वाराणसी नजिकच्या कबीर चौरा मंडलीय रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथं डॉक्टरांनी दीपक याला मृत घोषीत केलं आहे. डॉक्टर आणि सराफा व्यावसायिकांकडून खंडणी वसुल करण्यासाठी दीपक वर्मा याची परिसरात दहशत होती. गेल्या ६ वर्षांपासून त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद केली आहे. अखेर सोमवारी दीपक वर्मा पोलिसांच्या तावडीत सापडला.
उत्तर प्रदेशच्या चौबेपुर पोलीस ठाण्याच्या हद्दत बरियासनपूर गावात दीपक वर्मा असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी संबंधित परिसराला घेरलं. याच दरम्यान एका मोटारसायकलवरुन दोन संशयित व्यक्ती जात असल्याचं दिसलं. पोलिसांनी अडवलं असता दोघांनीही गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तात्काळ सतर्क होत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि भर रस्त्यात फिल्मी स्टाईल चकमक सुरू झाली.
चकमकीत दीपक वर्मा याला गोळी लागली आणि तो जखमी झाला. तर त्याचा साथीदार घटनास्थळावरुन पळ काढण्यास यशस्वी ठरला. गोळीबारात जखमी झालेल्या दीपक वर्माच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. दीपक वर्मा याच्यावर एक लाख रुपायांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं होतं. त्याच्यावर वाराणसीसह नजिकच्या पोलीस ठाण्यांमध्ये जवळपास २३ गुन्ह्यांची नोंद होती.