गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचं संरक्षण करणं पोलिसांचं काम असतं. चोरांना शोधण्याचं काम पोलीस करतात. पण पोलिसच चोरी करत असतील तर? मग अशा परिस्थितीत सुरक्षेची खात्री तरी कशी बाळगायची? उत्तर प्रदेशच्या वाराणसीत घडलेल्या एका घटनेमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. वाराणसीतील एका दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत पोलिसाची 'चोरी' कैद झाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक पोलीस दुकानात चोरी करताना दिसत आहे. दुकानदार महिलेचं लक्ष नसल्याचं पाहून तो दुकानात असलेल्या रॅकमधून डिओची एक बाटली उचलतो. त्यानंतर ती बाटली त्या दुकानदार महिलेलाच विकतो. याबद्दल महिलेनं नगवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी 'चोरी' करणाऱ्या पोलिसाचा शोध घेत आहेत.
वाराणसीतील असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक पोलीस शिपाई कैद झाला. खांद्यावर बंदूक लावून दुकानात आलेल्या शिपायानं आधी इकडे-तिकडे पाहिलं. दुकानदार महिलेचं लक्ष नसल्याचं पाहून त्यानं रॅकमध्ये असलेला २०० रुपयांचा डिओ उचलला. चोरलेली डिओ त्यानं पिशवीत टाकला.
दुकानदार महिला थोड्या वेळानं तिथे आली. त्यावेळी शिपायानं चोरलेला डिओ तिलाच विकला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. मात्र त्याची कल्पना शिपायाला नव्हती. डिओच्या बदल्यात पैसे मिळाल्यावर शिपाई तिथून निघून गेला. दुकानदार महिलेला चोरीचा संशय आल्यानं तिनं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. शिपायाच्या हालचाली पाहून तिला झाला प्रकार लक्षात आला.