मुंबई - चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी अंधेरीतील साकीनाका परिसरातून एका भाजी विक्रेत्याला अटक केली आहे. हरिप्रसाद पटेल असं या भाजी विक्रेत्याचे नाव असून अशा प्रकारचा मुंबईतील हा पहिला सायबर गुन्हा असल्याचे म्हटले जात आहे.सायबर पोलिसांनी मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या आणि सध्या साकीनाका येथे राहणाऱ्या हरिप्रसाद पटेलविरोधात गुन्हा दाखल केला. पटेल याने गेल्या वर्षी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर लहान मुलांचा एक अश्लील व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याचे अकाऊंट बंद केले होते. तरीही हरिप्रसाद याने मित्राच्या मोबाइलवरून नवीन अकाऊंट तयार केले आणि पुन्हा लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड केले. याप्रकरणी माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
चाईल्ड पोर्नोग्राफी फेसबुकवर वायरल केल्याने गुन्हा दाखल
अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अॅलण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन’(एनमॅक) ही संस्था चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे व्हिडीओ अपलोड केल्यानंतर माहिती देण्यासाठी या संस्थेशी भारताच्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (NCRB) करार केला आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत ही संस्था अमेरिकेच्या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन’(एफबीआय) या तपास यंत्रणेला माहिती देते.