डोंबिवली - एकीकडे वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच या गुन्ह्यातील एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून पाच रिक्षा आणि पाच दुचाकी असा ५ लाख ३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
सध्या वाहनचोरीच्या घटनांनी वाहनधारक चिंतेत पडले आहेत. रस्त्यावरीलच नाही तर सोसायटींमध्ये पार्क केलेल्या दुचाकी चोरीला जात आहेत. रिक्षा चोरीला जाण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात प्रतिदिन गुन्हे दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जे डी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहरातील चार पोलीस ठाण्यात विशेष पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांची स्थानिक पातळीवर अहोरात्र गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान यात मानपाडा पोलिसांना वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एका अट्टल चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. आकाश गुरूनाथ ढोणे (वय १९) राहणार भोईरवाडी, कांचनगाव, डोंबिवली पूर्व, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल भिसे, पोलीस उपनिरिक्षक कुणाल गांगुर्डे, पोलीस हवालदार भानुदास काटकर, सुधीर कदम, सोमनाथ ठिकेकर, संजु मासाळ, पोलीस नाईक सुधाकर भोसले, शांताराम कसबे, अशोक आहेर, पोलीस शिपाई सोपान काकड, गोरख शिंदे यांच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपी आकाश याच्याकडून त्याने चोरलेल्या प्रत्येकी पाच रिक्षा आणि दुचाकी जप्त केल्या आहेत.
आकाशने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६, मुंब्रा येथे २, तर महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि शांतीनगर पोलीस ठाणे भिंवडीच्या हद्दीत प्रत्येकी १ असे १० गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरिक्षक जे.डी मोरे यांनी दिली.
झाडाझुडुपात लपविल्या चोरलेल्या रिक्षा, दुचाकी -चोरलेल्या रिक्षा आणि दुचाकी आकाशने निळजेगाव तसेच डोंबिवली पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील मॉडेल कॉलेज मैदानातील झाडाझुडुपात लपवून ठेवल्या होत्या. रिक्षा आणि दुचाकी चोरल्यावर आकाश त्याची विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत होता. तत्पुर्वीच त्याला पथकाने अटक केली