मुंबई - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी २२ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. वाईन शॉप मालकाकडून २२ लाखांची लाच घेताना अंधेरी एमआयडीसी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 चे पोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर(४३) याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यात कलम ६५, ४१, ४३, ९०, १०८ महाराष्ट्र कायद्यान्वये २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आनंद भोईर कामकाज पाहत होते. तपासादरम्यान पाहिजे आरोपी असलेल्या वाईन शॉप मालकाविरोधात दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई न करण्यासाठी 25 लाखाची मागणी भोईरने केली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम २२ लाख इतकी ठरली. त्यानंतर वाईन शॉप मालकाने एसीबीला याबाबत माहिती दिली. एसीबीने प्रकरणाची शहनिशा करून आज सापळा रचला. सापळ्यादरम्यान खाजगी वाहनात चालकासह भोईरला 22 लाख स्विकारताना रंगेहाथ पोलिसांनी अटक केली आहे.