ठाणे - ठाणे शहरात दिवसा घरफोडी करून लॅपटॉप, टीव्ही, सिलिंडर आणि सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी परिमंडळ १ चे पोलीस आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पोलिसांचे एक पथक बनविले. या पथकाने सक्रिय टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी फरार आहे. या कारवाईमुळे ठाण्यातील १० घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने विशाल शेडगे आणि रामचंद्र मुणगे यांना अटक केली. विशाल हा पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणार तर रामचंद्र हा दिव्यात राहणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. या दोघांकडून चोरी केलेल्या लॅपटॉप, सिलिंडर, टीव्ही आणि साडेसहा तोळे सोनं असा एकूण ६ लाखांचे सामना पोलिसांनी हस्तगत केले आहे. या टोळीतील अन्य एका आरोपीचा शोध सुरु असल्याचे स्वामी यांनी सांगितले.