मुंबई – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुलुंडच्या बाजारातील आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. यावरून वाहतूक पोलीस आणि त्या व्यक्तींमध्ये कारवाईवरून वाद झाला. तेव्हा संतापलेल्या व्यक्तीनं पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केला.
त्यानंतर आता २४ तासानंतर या व्यक्तीने दुसरा व्हिडीओ जारी करत मुंबई पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे. मुंबई पोलिसांच्या कार्याला मी सलाम करतो. ज्यांना माझ्या कृत्यानं वाईट वाटलं अशा सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो असं या व्यक्तीनं मी मुलुंडकर या फेसबुक पेजवरून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्यक्तीचं नाव जतीन सतरा असं आहे.
मुलुंडच्या आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरून जतीन सतरा याने वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली. रागाच्या भरात जतीनने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि असभ्य वर्तवणूक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. अनेकांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. आरआरटी परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत होते.
त्यावेळी जतीनच्या बाईकवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी त्याच्या गाडीच्या नंबरचा फोटो काढला असता जतीनने त्यांना अडवलं. तेव्हा संतापून जतीनने वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप यांना अर्वाच्च भाषेत सुनावत दोघांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा जतीनसोबत असणाऱ्या तरूणाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. जतीनला शांत करण्याचा प्रयत्न तो तरूण करत होता. परंतु रागाच्या भरात जतीन पोलिसांसोबत गैरवर्तवणूक करत राहीला. या प्रकरणाची दखल वाहतूक पोलिसांनी घेत जतीन सतराविरोधात गुन्हा नोंदवला. वाहतूक पोलिसांनी घातलेली हुज्जत पाहून अनेकांनी जतीनवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर २४ तासांत जतीनचा माज उतरला आणि त्याने व्हिडीओ बनवून पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे.