नवी दिल्ली - विमानातून तस्करी करण्यासाठी चक्क शरीरात, शूजच्या सोलमध्ये, अंतर्वस्त्रात आदी संशय न येण्यासारख्या ठिकाणी अमली पदार्थ, परदेशी चलन, सोन लपविल्याच्या शक्कल लढवल्या जातात. मात्र, काल केलेल्या कारवाईत एक अनोखी शक्कल पाहायला मिळाली. चक्क भुईमुगाच्या शेंगात परदेशी चलनातील नोटांची एक इसम तस्करी करताना आढळून आला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स - सीआयएसएफ) एका धडक कारवाईमध्ये तब्बल ४५ लाख रुपयांच्या परदेशी चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावरील टर्मिनल ३ येथे बुधवारी मुराद अली याच्यावर ही कारवाई करण्यात आली. दुबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानात चढण्यापूर्वीच संशयास्पद हालचालींमुळे त्याच्यावर नजर ठेवत सुरक्षा रक्षकांकडून अखेर ही कारवाई करण्यात आली.
स्कॅनिंग मशिनमधून सामानाची बॅग जात असताना संशयास्पद आढळून आलं. ४५ लाखांचे परदेशी चलन भुईमुगाच्या शेंगांसोबतच शिजवलेलं मटण आणि बिस्कीटांच्या पॅकेटमधून एक व्यक्ती घेऊन जात असल्याचं लक्षात येताच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर मुरादला ताब्यात घेण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये पाचशे आठ वेगवेगळ्या परदेशी चलनातील नोटा हाती लागल्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या प्रवाशाच्या सामानातून शिजवलेल्या मांसाच्या तुकड्यांमध्ये भुईमुगाच्या शेंगांमध्ये आणि बिस्कीटांमध्ये परदेशी चलनाच्या नोटा सापडल्याची माहिती सीआयएसएफचे प्रवक्ते जनरल हेमेंद्र सिंह यांनी दिली. सीआयएसएफच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओ बिस्कीटांच्या पॅकेटपासून, शिजवलेलं मटण आणि भुईमुगाच्या शेंगापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये सौदी रियाल, कतारी रियाल, कुवैती दिनार, ओमानी रियाल आणि युरो आढळून आले. या सर्व परदेशी चलनातील नोटांची किंमत ४५ लाख असल्याचे सीआयएसएफकडून सांगण्यात आले.