नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. पण आता एक अजब घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीतील घरगुती हिंसाचाराचं प्रकरण आता समोर आलं आहे. एका मुख्याध्यापकाला त्याची पत्नी घरी दररोज तवा, बॅटने बेदम मारहाण करत होती. बायकोला कंटाळलेल्या मुख्याध्यापकाने पुरावे एकत्र करण्यासाठी घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार आता कैद झाला आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक असलेले अजित सिंह यादव यांनी पत्नी सुमनविरोधात छळ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्नी दररोज आपल्याला तवा, काठी, बॅट किंवा हातात जी काही वस्तू मिळेल त्याने बेदम मारहाण करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मुख्याध्यापकाने पुरावे मिळावेत म्हणून आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आणि आता आपल्या सुरक्षेसाठी कोर्टात धाव घेत, पुरावे म्हणून सीसीटीव्ही फुटेज सादर करत आपल्याला सुरक्षा आणि न्याय देण्याची मागणी केली आहे.
अजित यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सात वर्षांपूर्वी त्यांचं सुमनशी लव्ह मॅरेज झालं. काही कालावधीनंतर सुमनचं वागणं अचानक बदलू लागलं. ती दररोज टॉर्चर करते. कधी क्रिकेट खेळण्याच्या बॅटने, कधी जेवण बनवण्याच्या तव्याने मारते. घरातील कोणतीही वस्तू तिच्या हातात येते, त्याने ती मारत सुटते. सर्व घडूनही सुमनवर कधीच हात उचलला नाही. कायदा हातात घेतला नाही. मी एक शिक्षक आहे आणि शिक्षकाने महिलेवर हात उचलणं म्हणजे आपला पेशा आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेत. कायदा हातात घेणं आहे. जर हे माझ्या विद्यार्थ्यांना समजलं असतं तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असता."
अजित सिंह मानसिकरित्याही आजारी पडले आहेत. काही क्षणातच ते सर्वकाही विसरतात. फक्त कामच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांची नावंही विसरतात. मारहाणीच्या भीतीने ते महिनाभर आपल्या घरी गेले नाहीत. इथं तिथं लपूनछपून दिवस काढत आहेत. अमेरिकेत असलेला बायकोचा भाऊच तिला हे सर्व करायला भाग पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.