मुंबई - दसऱ्याच्या रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी अमृतसर येथील ट्रेन दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आज मुंबईत घडली असती. मध्य रेल्वेच्य प्रवाशांनी आज जीव धोक्यात घालून आठवड्याची सुरुवात लेट मार्कनं होऊ नये म्हणून दिवा रेल्वे स्थानकात पटरीत उतरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडिओत या प्रवाश्यांच्या जीवघेण्या प्रयत्नामुळे अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली असती.
आज ऐन गर्दीच्यावेळी सकाळीच चाकरमानी ऑफिसला वेळेत पोहचण्यासाठी घाई गडबडीत असताना मध्य रेल्वे कसारा ते वासिंद सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे नोकरदार वर्ग तसेच प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. खडवली आणि वासिंदच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, काही प्रवाशी जीव धोक्यात घालून सीएसएमटीकडे जाणारी धावती लोकल पकडण्यासाठी रेल्वे पटरीवर उतरले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच विरुद्ध दिशेने एक लांब पल्ल्याची ट्रेन देखील येत असल्याचे दृश्य या व्हिडिओत असून काळजाचा ठोका चुकवणार हा व्हिडीओ आज सकाळचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.