मुंबई : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी रायगड आणि मुंबई पोलिसांनी आज रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला होता. यावर पोलिसांच्या कारवाईवेळचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पोलीस मारहाण करताना दिसत नव्हते. मात्र, यावर गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनलने नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे.
यामध्ये अर्णब गोस्वामी हे उजव्या हातावर उमटलेला व्रण दाखवत आहेत. तसेच त्यांनी पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सचिन वझे व अन्य सात पोलिसांनी घेरून मानेला धरत घराबाहेर नेले. पायात शुजही घालू दिले नाहीत, असा आरोप केला आहे. गोस्वामी यांना आज सकाळी ७ च्या सुमारास रायगड पोलिसांनी अटक केली.
माहितीनुसार, वरळी येथील अर्णब गोस्वामी यांच्या राहत्या घरी रायगड पोलिसांसह मुंबई पोलीस अधिकारी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. कायद्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत असं पोलिसांनी सांगितले. तेव्हा अर्णब यांचा मुलगा मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अर्णब यांनी माझ्या मुलाला हात लावू नका असं पोलिसांना बजावलं.
जवळपास १५ मिनिटं पोलीस आणि अर्णब गोस्वामी यांच्या बाचाबाची झाली. पोलिसांनी अर्णब गोस्वामींना हाताला पकडून खेचून नेण्याचा प्रयत्न केला, तसेच महिला पोलीस अधिकाऱ्याने अर्णब यांच्या पत्नीकडून कायदेशीर कागदपत्रावर सही घेण्याचा प्रयत्न केला, पोलीस कारवाईला अर्णब गोस्वामी कुटुंबाने विरोध केल्याचं या व्हिडीओत दिसून आलं.
याबाबत अर्णब गोस्वामींनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे, तसेच माझ्या मुलाला मारलं, मला औषधे घेण्यापासून रोखलं गेले, तसेच कोणत्याही परवानगीशिवाय पोलिसांनी जबरदस्तीने माझ्या घरात प्रवेश केला. पोलिसांनी माझा आणि कुटुंबाचा छळ केला असा आरोप केला, अर्णब यांनी कारवाईला सहकार्य करावं अशी विनंती पोलिसांनी केली, परंतु न ऐकल्याने अखेर पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना खेचत घराबाहेर आणलं आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवलं.