खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे मूक आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. नांदेडमध्ये कोविड काळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाने मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे यांनी केले. कोविड काळात मोर्चे, सभांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळे पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांचे आरक्षण असैविधानिक घोषित केल्यानंतर तसेच माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी निरीक्षणं नोंदवली आहेत की, कोविड संक्रमण काळात असे मोर्चे, सभा झाल्या नाही पाहिजे. त्याच धर्तीवर परत असे कृत्य करणे हे न्यायालयाच्या विरोधात आहे, असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.