मुंबई - जुहू गल्ली येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता फेरीवाल्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरच हात उगारला. त्यानंतर वॉल्कीटॉल्कीवरून जुहू गल्लीतील हाणामारीबाबत माहिती मिळताच डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक परमेश्वर गनमे हे घटनास्थळी पोचले आणि त्यांनी पोलिसांवर हात उचलणाऱ्या फेरीवाल्यांना पोलिसी खाक्या दाखवत बेड्या ठोकल्या.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाबरोबर जुहू गल्ली आणि अंधेरीमधील गिलबर्ट हिल्स रोडवरील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत होते. त्यावेळी तेथील फेरीवाल्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांची कॉलर पकडली आणि त्यां ना धक्काबुक्की करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याबाबत वॉल्कीटॉल्कीवरून डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गनमे यांना संदेश प्राप्त होताच त्यांनी घटनस्थळी धाव घेतली आणि खाकी वर्दीवर हात उगारणाऱ्या मुजोर फेरीवाल्यांना चांगलाच चोप देत ताब्यात घेतले.
व्हिडीओमागील वायरल सत्य
ही कारवाई सुरु असताना काही फेरीवाल्यांनी पोलिसांना केलेली धक्काबुक्की मोबाईलमध्ये शूट केली नाही. मात्र, या घटनेचे उलट चित्र दाखविण्याकरिता खाकीवर हात उगारल्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई शुटींग करुन पोलीस फेरीवाल्यांना उगाच त्रास देत असल्याचे सांगत हा व्हिडीओ वायरल करण्यात आला.
मुंबई पोलिसांनी दिली ट्विटरवरून माहिती
या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती ट्विटवरुन दिली आहे.पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३३२ (सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलणे,) आणि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळावरुन पळलेल्या एकाचा शोध सुरु आहे.
राज्य मानव अधिकार आयोगाकडे तक्रार
याप्रकरणी फेरीवाल्यांची बाजू मांडत लॉचे शिक्षण घेणाऱ्या निदा खत्री या विद्यार्थिनीने राज्य मानव अधिकार आयोगाकडे आज अर्ज दाखल केला आहे. याबाबत सखोल चौकशी होऊन मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी तिने केली असल्याची माहिती निदाने लोकमतशी बोलताना दिली.