नालासोपारा : मुंबईपोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाने नालासोपारा शहरातून १४०० करोडचा अंमली पदार्थांचा साठा पकडल्याने वसईत खळबळ माजली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. यापूर्वीही अनेक वेळा नालासोपारा शहरात अंमली पदार्थ सापडले आहेत.वरळी येथील अंमली विरोधी कक्षाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतील आरोपींनी नालासोपारा शहरातून एम डी हा अंमली पदार्थ विकत घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर नालासोपाऱ्याच्या हनुमान नगर परिसरातील सीताराम बिल्डिंगच्या गाळा नंबर १ मध्ये बुधवारी धाड मारली. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल १४०३ करोड ४८ लाख रुपयांचा ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा एम डी या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना तपासात प्राथमिक माहिती मिळाली की, या आरोपीने रसायन शास्त्रामध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतलेले असून वेगवेगळे केमिकल एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून एम डी अंमली पदार्थ बनविण्याचे ज्ञान त्याने आत्मसात केले आहे. तो मागणीप्रमाणे अंमली पदार्थ बनवून देत होता. तसेच तो स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करत होता.नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी ब्राऊन शुगर, गांजा, चरस विकणाऱ्या टोळ्या कार्यरत असून विकत घेण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, मुंबई याठिकानाहून नालासोपारा शहरात येतात. पोलिसांनी अनेक कारवाई केलेल्या असूनही यावर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहे. विविध ठिकाणी तर लिक्विड स्वरूपात ड्रग्सची तस्करी सुद्धा नालासोपारा शहरात केली जात असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी हे पोलिसांची डोकेदुखी ठरलेली असताना तुटपुंज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवावर या गर्दुल्यांचा सुपडा साफ करण्यास पोलिसांना अपयश आले आहे.
नायजेरियन नागरिकांचा अड्डानालासोपारा शहरात पूर्व आणि पच्छिम विभागातील दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोकांचा जणू अड्डाच बनला आहे. तुळींज आणि नालासोपारा पोलीस स्टेशन अंतर्गत अंदाजे हजारो नायजेरियन लोक राहत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. पोलीस प्रशासन यांच्यावर वेळीच कारवाई करत नसल्यामुळे यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे. जर वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.