उपनगरातील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला देशात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली. मुख्य म्हणजे ही धमकी देणाऱ्याने व्हिडिओ कॉल करत हा प्रकार केला असून याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रफत हुसैन (५५) असे तक्रारदाराचे नाव आहे. जे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी सांताक्रुझ पोलिसाना दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींकडून त्यांना कथितरित्या व्हिडिओ कॉल केला. कॉलर ने दावा केला की ते देशात बॉम्बस्फोट घडवून आणणार आहेत. त्यानंतर हुसैन यांनी सांताक्रूझ पोलिस ठाणे गाठले आणि अधिकार्यांना धमकीच्या कॉलबद्दल माहिती दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सदर अनोळखी व्यक्ती विरोधात कलम ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचा शोध सुरू आहे असे त्यांनी सांगितले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आरोपीची ओळख पटली आहे. तसेच पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले आहे. मात्र याबाबत अधिक काही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.
यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी देखील मुंबई पोलिसां च्या नियंत्रण कक्षावर झवेरी बाजार परिसरात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. मात्र पोलिसांनी लगेचच तपास करत दिनेश सुतार नावाच्या व्यक्तीला अटक करत तो फेक कॉल असल्याचे उघड केले. त्यानुसार सांताक्रुझ प्रकरणाचा तपास ही पोलीस करत आहेत.