कानपूर - मध्यरात्री एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे उघडकीस आली आहे. कपडे काढून छाती दाखव तुझ्या सर्व केसेस संपवतो, तू मला हवी अशा शब्दात त्याने महिलेशी संवाद साधला. या घटनेनंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन केले.
ही घटना बिल्होर परिसरातील आहे. याठिकाणी राहणारी महिला कौटुंबिक वादामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी महेंद्रसिंह यांना भेटली होती. जेव्हा महिला तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली तेव्हा अधिकाऱ्याने मी तुला रात्री फोन करेन तेव्हा काय आरोप असतील ते सांग असं म्हटलं. पोलीस ठाण्यातील या घटनेनंतर महिला तिच्या घरी परतली.
पोलीस अधिकाऱ्याने २६ मार्च रोजी रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी महिलेला फोन केला. मी तुझे प्रकरण पाहत आहे. त्यानंतर मी तुला व्हिडिओ कॉल करतो, कपडे काढून छाती दाखव, तुझ्यावरील सर्व केसेस संपवतो असं अधिकाऱ्याने ऑफर केली. पोलीस अधिकाऱ्याच्या या बोलण्याने महिला हैराण झाली. तिने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनेचा प्राथमिक तपास केला त्यात अधिकारी दोषी आढळला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी महेंद्र सिंह यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित केले. सध्या या प्रकरणाचा तपास एसीपीकडून करण्यात येत आहे. एडीसीपी लखन सिंह यादव यांनी महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्याचं म्हटलं. त्याचसोबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोषी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.