मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिला डब्यात सहप्रवासी असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून रेल्वे ट्रॅकवर उडी मारून फरार होत असलेल्या चोरट्या महिलेला बेड्या ठोकण्यात कुर्ला लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. या चोरट्या महिलेचे नाव सीता सोनावानी (वय २५) आहे. ही महिला दिव्यातील एका चाळीत राहते. विशेष म्हणजे या महिलेने थांबलेल्या लोकलमधल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र या महिलेने खेचून सरळ ट्रॅकवर उडी मारून पळ काढला होता. सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजवरून कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी चोरट्या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मछिंद्र चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मध्य रेल्वेवरील विक्रोळी स्थानकात हा प्रकार घडला आहे. ही महिला सीएसएमटी – कल्याण लोकलमध्ये प्रवास करत होती. लोकल विक्रोळी स्थानकात पोहोचताच तिने एका महिलेचं मंगळसूत्र ओढलं आणि पलायन करण्यासाठी तिने ट्रॅकवर उडी मारली. सुदैवाने त्यावेळी विरुद्ध दिशेने कोणतीही लोकल जात नव्हती. अन्यथा महिला थेट रेल्वेखाली आली असती. सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे महिलेने उडी मारल्यानंतर समोरील प्लॅटफॉर्मवरून पळ काढला. कुर्ला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत महिलेला अटक केली आहे. कळवा येथून या महिलेला अटक करण्यात आली. प्रवासादरम्यान लोकल विक्रोळी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबली असता सीता सोनवाणी हिने संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले असता मंगळसूत्र तुटून सोन्याचा तुकडा तिच्या हातात आला. हा सोन्याच्या मंगळसुत्रचा तुकडा १८ हजार किंमतीचा असून तक्रारदार महिलेचे नाव मालतीदेवी सिंग (वय ३०) हे आहे. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विक्रोळी स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये घडलेला सर्व प्रकार कैद झाला होता.त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी सीता सोनवाणीची ओळख पटवून घेतली आणि तपास सुरु केला. अटक महिला अट्टल चोर असल्याने याधीही तिने चोर्या केल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.