गडचिरोली : येत्या २८ जुलैपासून सुरू होत असलेल्या नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलींनी पुरून ठेवलेली स्फोटकेपोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे त्यांचा हिंसक कारवाया करण्याचा डाव उधळल्या गेला. ही स्फोटके कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या पुराडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडली.पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना लवारी जंगलात नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या लपवून ठेवलेले स्फोटक व इतर साहित्य पोलिसांच्या हाती लागले. त्यात कुकर बॉम्ब १ नग, पॅन्ट व शर्ट, पिट्टू बॅग, शाल, प्लास्टिक शिट, बँडेज पट्टी, चिमटा, व्हॅसलिन डबी, बॅटरी (व्हेलॉसिटी), स्प्रिंग, ३०३ रायफलचे रिकामे काडतूस, एसएलआर रायफलचे रिकामे काडतूस, पेंचिस आणि ३ पुस्तके आदी साहित्य आढळले. यापैकी कुकर बॉम्ब जागेवरच नष्ट करण्यात आला तर इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले.
नक्षलविरोधी अभियानाला गती२८ जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान नक्षलवादी मृत सहकाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान हिंसक कारवाया करण्यासोबतच नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. परंतू या सप्ताहाचा दैनंदिन जनजीवनावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्रपणे राबविणे सुरू केले आहे.