बरेच लोक कोरोना व्हायरस लॉकडाउनला गंभीरपणे घेत नाहीत आणि रस्त्यात अडवत असलेल्या पोलिसांशी लोक भांडत आहेत. तथापि, लोकांना काही आवश्यक गोष्टींसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत देखील बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील कुठे पोलिसांवर हल्ले तर कुठे पोलिसांची दंडुकेशाहीमुळे नागरिक संतप्त आहे. त्यातच कोलकात्यात एका महिलेने टोकाची पातळी गाठत पालीस अधिकाऱ्यालाच चावा घेतला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्यामागील कारण कोलकाता पोलिसांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केल्यावर एका महिलेने पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. व्हायरल व्हिडीओ मध्ये महिलेने पोलिसाला चावा घेतला.
मिळालेल्या वृत्तानुसार, पीएनबी मोरे येथे पोलिसांनी दुपारी 12.30 वाजता कॅब थांबवल्याची घटना घडली. सीए ब्लॉक बाजूने वाहन येत असताना ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गाडी थांबवली आणि गाडीत बसलेल्या लोकांना त्यांच्या प्रवासाबद्दल विचारणा केली. त्यानंतर आरोपी महिला गाडीतून बाहेर आली आणि पोलिसांकडे धावली आणि चावण्याचा प्रयत्न केला.
आरोपी महिला आणि तिचा मित्र सॉल्ट लेक येथे गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी औषध खरेदी करणार असल्याचा दावा केला. पण कोणतेही प्रिस्क्रिप्शन दाखविण्यासाठी त्यांच्याकडे नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
"आम्ही त्या महिलेशी काहीही बोललो नाही पण ती वाहनातून बाहेर आली आणि तिने आमच्या एका अधिकाऱ्यावर हल्ला केला," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने असा आरोप केला की, या महिलेने आपल्या जुन्या जखमेतून रक्त काढले आणि धमकी दिली.
व्हायरल व्हिडिओमध्ये ती स्त्री ओरडताना ऐकू येते की, ती एकटीच राहत असल्याने तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. नंतर, पोलिसांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला केल्याबद्दल महिलेस अटक केली, असे बिधाननगर शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. वाहन प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल वाहन चालविणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.