मुंबई - लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला पोचल्याने एकाच खळबळ माजली आहे. महाबळेश्वरला जाण्यासाठी त्यांना गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र परवानगी म्हणून मिळाल्याने आणखीच चर्चेला उधाण आले आहे.
डीएचएफएलचे कपिल वाधवान कुटुंबियांचे २३ सदस्य यांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. याला कशी परवानगी देण्यात आली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या या २३ जणांविरुद्ध महाबळेश्वर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जिल्ह्याची सीमा ओलांडण्यास देखील मनाई आहे. असे असून देखील या कुटुंबातील २३ जणांनी कशी काय ट्रिप केली, याची सखोल चौकशी होणार आहे.