मुंबई - चालत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणं वा लटकत प्रवास करणे जीवघेणं ठरू शकतं, अशी रेल्वे प्रशासनाद्वारे वारंवार सूचना केली जाते. मात्र, जीवघेणा स्टंट करणाऱ्या स्टंटबाजांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वडाळा रेल्वेपोलिसांंनी स्टंट करणाऱ्या एकाला बुधवारी अटक केली. ही कारवाई करत असताना स्टंटबाजाच्या मित्राने पोलिसावर हात उगारल्याने पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या.
हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या दरवाजाला लटकून इतर प्रवाशांना चढू-उतरू न देणं, मोबाइल चोरणे आणि महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. त्यातच काही स्टंटबाज जीवाशी खेळून लोकलमध्ये माकडचाळे करत असतात. यातील आरोपी मोहम्मद हुसेन मकसुद सहा (१८) हा बुधवारी रे रोड स्थानकावर रेल्वेतून स्टंटबाजी करताना पोलिसांना आढळून आला. त्याचे स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओही पोलिसांजवळ होते.
मोहम्मद याला रे रोडवर गस्तीवर असणाऱ्या पोलीस शिपाई सचिन मंडले यांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी मोहम्मदचा मित्र मोनू रफिक मोहम्मद शेख (२२) त्या ठिकाणी येऊन पोलिसांशी हुज्जत घालू लागला. एवढ्यावरच न थांबता मित्राला सोडवण्यासाठी त्याने मंडले यांच्यावर हात उगारला. या वेळी गस्तीवर असलेले इतर पोलीस मंडले यांच्या मदतीला धावून आले. हे दोघेही विना तिकिट प्रवास करत होते. या दोघांना वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३३२, ३५३, ५०४, ३४ आणि रेल्वे कायदा १४७, १५६ नुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही रे रोड परिसरातील राहणारे आहेत.