इंदूर – सध्याच्या युगात इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की, क्षणातच एखादी घटना वाऱ्यासारखी वेगाने जगभरात पसरते. साता समुद्रापार असलेल्या नातेवाईकांशी काही सेकंदात बोलता येते. इंटरनेटच्या या काळात माणसं लांब राहत असली तरी एकमेकांच्या मदतीसाठी तात्काळ धावून येतात हे नुकत्याच मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडलेल्या घटनेने दिसून आले. वडिलांना मारहाण होत असल्याचं पाहत अमेरिकेतील मुलगा तात्काळ धावून आला आणि त्याने वडिलांना वाचवलं. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर जाणून घ्या ही घटना
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ६३ वर्षीय कैलाशचंद्र पारिक हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास ते ऑफिसच्या बाहेर बसले होते. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या त्यांचा मुलगा अंकितसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधत होते. त्यावेळी एक ओळखीचा व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि कैलाशचंद्र पारिक यांच्यासोबत वाद घातला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी व्यक्तीने कैलाशचंद्र पारिक यांना मारहाण सुरू केली.
हा प्रकार लाईव्ह कॅमेऱ्यात पाहणाऱ्या कैलाशचंद्र यांच्या मुलाने तातडीने गुगलवर जात इंदूर पोलिसांचा नंबर सर्च केला आणि त्याने फोन करून वडिलांना मारहाण होत असल्याचं पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी रवाना झाले. तोवर आरोपी कैलाशचंद्र यांना मारत असल्याचं पाहताच कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी आले परंतु आरोपीने कुणालाही जुमानलं नाही. आरोपीनं कैलाशचंद्र यांना बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार अंकित लाईव्ह पाहत होता. ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत आरोपीने कैलाशचंद्र यांना मारहाण करून तिथून पळ काढला होता.
पोलिसांनी कैलाशचंद्र यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेले तर मुलाच्या तक्रारीवरून त्यांनी गुन्हा नोंदवत पुढील तपासाला सुरूवात केली आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र ऐनवेळी सातासमुद्रापार असलेल्या मुलाने प्रसंगावधान राखत पोलिसांना कळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलीस घटनास्थळी चौकशी करत असून आरोपी इसम आणि कैलाशचंद्र पारिक यांच्यात व्यावसायिक जुने वाद असल्याचं समोर आलं आहे.