परळी येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्य करण्यावरून दोन व्यक्तींतील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी ट्वीटद्वारे शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील कॅबिनेट मंत्री आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?; दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप व्हायरल
वाघ यांनी म्हटले आहे की, गृहमंत्रीजी सध्या राज्यातील महिला अत्याचारावबाबत ”संजय”ची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधाऱ्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावेच्या भुमिकेत दिसताहेत. पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलच मोठा पुरावा आहे. १२ संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत.ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना कथित मंत्र्याकडून कुण्या अरूणला होताना सगळ्यांनी ऐकल्या, अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही. पूजा चव्हाणच्या परीवारावर दबाव असू शकेल पोलीस अशा केसेस स्यु-मोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोच अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. मुख्यमंत्री महोदय एवढे पुरावे असताना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय?? असा सवाल चित्र वाघ यांनी करत संजय राठोड यांचे थेट नाव घेऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
व्हायरल ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असादेखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कथित मंत्री व त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण झाले. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि त्या कथित मंत्र्याने सदर युवतीचा मोबाइल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते.पूजा लहू चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली होती.