- सुरेंद्र राऊतयवतमाळ : ऑनलाइन पद्धतीने बँक खाते हॅक करून परस्पर रोकड काढणाऱ्या ४० सदस्यीय आंतरराज्यीय टोळीचा जिल्ह्यातील दिग्रस पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी टोळीच्या प्रमुख सदस्याला बिहारमधून गजाआड करण्यात आले आहे. विशेष असे, या टाेळीत कॉलिंग, रोख ट्रान्स्फर, विड्रॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत असून, त्यापोटी त्यांना दोन ते पाच टक्के कमिशन दिले जात असल्याची बाब तपासात उघड झाली आहे.
विकासकुमार विनोदसिंह, रा. आजमपुरा, पो. जलालपूर, ता. वारसलीगंज, जि. नवादा, बिहार, असे या आरोपीचे नाव आहे. त्याला त्याच्या बिहारमधील मूळ गावातून दिग्रस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावत यांच्या पथकाने अटक केली. या आरोपीकडून अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याने २७ व २९ मे २०२० या दोन दिवसांत ही रक्कम बँक खात्यातून काढली. पोलिसांनी अशा पद्धतीच्या २५ गुन्ह्यांची पडताळणी केली. यात औरंगाबाद, गडचिरोली, मुंबई, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथील फसवणूक झालेल्या व्यक्तींशी संपर्क करून गुन्ह्याची पद्धत जाणून घेतली. तब्बल दोन महिने यावर परिश्रम घेतल्यानंतर ठगविणाऱ्याचा सुगावा लागला. दिग्रस पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात बँक खात्यातून परस्पर अडीच लाख रुपये काढण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करताना या आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला.
झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये या टोळीचे नेटवर्क आहे. या राज्यातून एकाच वेळी हे नेटवर्क ऑपरेट केले जाते. एकाच वेळी संपूर्ण नेटवर्क पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून कमिशन बेसवर प्रत्येकाला कॉलिंग ते विड्रॉलसाठी स्वतंत्र जबाबदारी दिली जात असल्याचेही निष्पन्न झाले.
...अशी आहे गुन्ह्याची पद्धतहे गुन्हे करणाऱ्यांची विशिष्ट पद्धत आहे. त्यासाठी बँक खातेधारकाच्या मोबाइल सीमकार्डचा ॲक्सेस घेतला जातो. त्यानंतर ग्राहकासाठी काही वेळ हे सीम बंद पाडले जाते. प्रत्यक्षात सीम ॲक्सेसच्या माध्यमातून बँक खाते ऑपरेट करीत ओटीपी जनरेट करून पैसा काढून घेतला जातो. सीमकार्ड सुरू झाल्यानंतर ग्राहकाला मॅसेज येत नाही. त्यामुळे खात्यातून पैसे उडविल्याचे लगेच लक्षात येत नाही. जेव्हा-केव्हा खातेधारक बँकेत जाईल तेव्हा हा प्रकार उघड होतो. दिग्रससारख्या लहानशा पोलीस ठाण्यातून देशपातळीवर फसवणुकीचे गुन्हे करणारी टोळी रेकॉर्डवर आली आहे. वरिष्ठांकडून पुरेसा बॅकअप मिळाल्यास या तपासात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...असे चालते नेटवर्क
झारखंडमधील जामतारा येथून केवळ कॉलिंग करण्यात येते. पश्चिम बंगालमधून केवळ सीम खरेदी केले जाते. ओडिशा येथे मिळालेला पैसा विविध खात्यात ट्रान्स्फर केला जातो. नंतर तो बिहारमध्ये पैसा बँक खात्यातून काढला जातो. या पद्धतीने फसवणूक करणारे रॅकेट काम करते. यामुळे आजपर्यंत पाेलीस तपासात हे पूर्ण नेटवर्क कधीच उघड झाले नाही. जास्तीत जास्त कॉलिंग होणाऱ्या झारखंडमधील जामतारापर्यंतच पोलिसांचा तपास जातो. पुढे सुगावा लागत नाही.
लॉकडाऊनमधील सव्वाकोटी आणि प्राप्तीकर नोटीसऑनलाइन पद्धतीने बँक अकाउंट हॅक करून लॉकडाऊन काळात तब्बल १ कोटी ३८ लाख रुपये जमविल्याची कबुली आरोपीने दिली. खात्यात आलेली एवढी मोठी रक्कम पाहून प्राप्तीकर विभागाने या आरोपीला नोटीसही बजावल्याचे पुढे आले आहे.