मुंबई - 5 वर्षांपूर्वी चेंबूर येथे दुचाकीस्वाराचा अपघातात झालेला मृत्यू हा अपघात नसून सुपारी किलिंग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सुपारीचे पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे आरोपीने दारूच्या नशेत खबऱ्याकडे सर्व बडबडला. त्यामुळे उत्तर प्रदेशातील गावच्या सरपंचानेच त्याच्या व्यावसायिक भागिदाराची हत्या घडवून आणल्याचे उघड झाले.
2014 साली वडाळा टी. टी. पोलिसांच्या हद्दीतील चेंबूर येथील वडाळा लिंक रोड परिसरात सायकलवरून जाणाऱ्या इकबाल बरकर खान (40) यांना अनोळखी टँकरने धडक दिली होती. त्याप्रकरणी अनोळखी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी न सापडल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अ वर्गीकरण केले होते. पण या टॅंकर चालकाला अमोल तात्यासो पटोबा (36) याला या सुपारी किंलिंगचे ठरलेले 30 हजार मिळाले नसल्यामुळे दारूच्या नशेत त्याने या हत्येबाबत बाळगलेली गुप्तता उलगडले. ती माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 3 च्या पोलिसांपर्यंत पोहोचल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत पोपटासारखा बोलल्यामुळे त्याचा मालक सैफुद्दीने कुरेशी (45) याचाही हत्येतील सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी त्याने खान याचा व्यावसायिक भागीदाराने खानला मारण्यासाठी 40 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा तपास उत्तर प्रदेशातील एका गावचा सरपंच व खानचा व्यावसायिक भागिदारापर्यंत पोलिसांचा तपास पोहोचला. खानमुळे त्याचा यापूर्वी निवडणूकीत पराभव झाला होता. तसेच खानला त्याला 10 लाख रुपये देणे बाकी होते. त्यामुळे त्याने खानचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी कुरेशी व टॅंकर चालक अमोल यांना अटक केली असून तिसरा आरोपीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशाला रवाना झाले आहेत.