कोलकाता न्यायालयाने सोमवारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी केली. याच दरम्यान आरोपी संजय रॉयने तो निर्दोष असून त्याने काहीही केलेलं नाही. न्यायालयात त्याला बोलू दिलं जात नसून त्याला या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचंही आराडोओरडा करून म्हटलं आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी मुख्य आरोपी संजय रॉय हा हजर होता आणि ट्रेनी डॉक्टरचे वडीलही कोर्टात हजर होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दुपारी संजय रॉय याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयातून बाहेर पडताना त्याने पुन्हा एकदा आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून प्रशासनाने आपल्याला या प्रकरणात अडकवल्याचं सांगितलं. संजय रॉय म्हणाला, "मला आजही त्यांनी बोलू दिलं नाही. मी काहीही केलेलं नाही. मला अडकवण्यात आलं आहे."
कोलकाता पोलिसांना आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडला. एका दिवसानंतर, संजय रॉयला अटक करण्यात आली, घटनास्थळी काही पुरावे देखील सापडले. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त होत आहे.