मुंबई: लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नेहमीच चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडे आणि तिच्या एका साथीदाराला मुंबईपोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पूनम पांडे कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यासाठी बाहेर गेली होती. त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रविवारी रात्री तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. या सर्व प्रकरणानंतर आता पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
पूनम पांडे या व्हिडिओमध्ये म्हणाली की, मला अटक झाल्याबद्दल वृत्त आलं आहे. मात्र तसं काही झालेलं नाही. मी घरी आहे. मी ठीक आहे आणि सेफ आहे. काही सामान आणण्यासाठी मी काल सायंकाळी बाहेर गेले होते. परंतु मात्र अटक झालेली नाही, असं पूनम पांडेने व्हिडिओद्वारे सांगितले आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुंबईसह देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मरीन लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या नाकाबंदीमध्ये पूनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद बीएमडब्ल्यू कारने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता बाहेर फिरण्याबाबत त्यांना योग्य उत्तरे देता आली नाहीत, असं पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्यांची गाडी ताब्यात घेतली असून दोघांनाही नोटीस देऊन सोडण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.