नवी मुंबई - कळंबोली मॅक्डोनल्ड हॉटेल समोरुन सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना जबलपूर येथून अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जबलपूर येथील आरपीएफ यांचे मदतीने पोलिस तपास पथकाने सकाळी ११ वाजताच्या सुमारास जबलपूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्या. तसेच आरोपींनी गुन्हयामध्ये वापरलेलय गाडीचा चालक हा गुन्हयातील इतर आरोपीचा नातेवाईक असून चालक आरोपी याचा गुन्हयातील सहभाग स्पष्ट झाल्याने त्यास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्हयामध्ये पाचव्या आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भा. दं. वि. कलम ३९७ वाढविण्यात आलेले असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
कर्नाटक येथे राहणारे संतोष मुरबी हे ५ नोव्हेंबर रोजी बेळगांवला जाण्यासाठी कळंबोली मॅक्डोनल्ड हॉटेलसमोर सायन पनवेल रोडवर थांबले होते. त्यावेळी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांनी एका गाडीला हाताचा इशारा केला आणि भाडे विचारून ते कारमध्ये बसून निघाले होते. कारमधील चार अनोळखी इसमांनी फिर्यादी मुरबी यांना मारहाण करून त्यांच्या डोळयात मिरचीची पुड टाकली. कारमधील चौकडीने संतोष मुरबी यांच्या शर्टाच्या आतील जॅकेटचा खिसा फाडून खिशात ठेवलेल्या १० हजार २०० रुपये रोख व १८९० ग्रॅम वजन असलेल्या २० सोनसाखळ्या व २ मोबाईल असा एकूण ५० लाख ७० हजार ६९० रुपये किंमतीचा माल चोरी केला. या प्रकराबाबत संतोष मुरबी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासादरम्यानआरोपी हे मध्य प्रदेशातील जबलपूर रिवा येथे जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. तत्काळ जबलपूर रिवा येथे आरोप पोहचण्यापुर्वी एक पोलीस तपास पथक जबलपूर येथे पोहचण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनसहून काशी एक्सप्रेसने जबलपुर येथे जाण्यासाठी बसले होते. परंतु पोलीस त्यांच्या मागावर असल्याची त्यांना शंका आल्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी ते इगतपुरी येथे उतरले. त्यानंतर पॅसेंजर रेल्वेने इगतपुरी ते इटारसी असा प्रवास केला. आरोपी हे रेल्वेने पलायन करीत असल्याने पलायन मार्गावरील पुढील रेल्वे स्टेशन जळगाव येथील स्थानिक पोलीसांची मदत घेऊन आरोपींचा पाठलाग करण्यात आला.परंतु आरोपी हे वारंवार ट्रेन बदलत असल्याने पोलिसांना हुलकावणी देत होते. आरोपी हे पुढे जबलपुरच्या दिशेने जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळताच त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे पथक जबलपुर येथे रवाना करण्यात आले.