रतलाम: मध्य प्रदेशच्या रतलाममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी आणि काही लोक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. घटना १९ जानेवारीला घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. डॉक्टरांनी एका महिला रुग्णासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. रुग्ण महिला आणि तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या दवाखान्यात घुसून गोंधळ घातला आणि त्यांना मारहाण केली.
डॉक्टरांनी तरुणीची माफी मागितली. यानंतरही तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांना मारहाण केली. मात्र दोन्ही बाजूंनी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ डॉ. राजेश पाटनी यांचा आहे. रतलाममध्ये त्यांचा दवाखाना आहे.
जवळपास १५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये डॉक्टरांच्या समोर काही तरुणी उभ्या असल्याचं दिसतं. यावेळी एक अज्ञात व्यक्ती तुम्ही माफी मागा असं सांगतो. माझ्याकडून काही चूक झाल्याचं तुम्हाला वाटत असेल तर मी माफी मागतो. मला माफ करा, असं म्हणत डॉक्टर तरुणीच्या पाया पडतात.
डॉक्टरांचं पाया पडून होताच तरुणीनं डॉक्टरांच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर तिच्या सोबत असलेल्या लोकांनीदेखील डॉक्टरांना मारहाण केली. त्यामुळे दवाखान्यात एकच गोंधळ झाला. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या एकाही व्यक्तीनं तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.