उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एका अकाउंटंटचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या दिवशी अकाउंटंटने लाच घेतली तो दिवस त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता, असं सांगितलं जात आहे. नोकरीच्या शेवटच्या दिवशी तो कार्यालयात ३ हजार रुपयांची लाच घेताना कॅमेऱ्यात पकडला गेला. पैसे देणारा व्यक्ती सांगत होता की, मी रेशन विकून पैसे आणले आहेत आणि ते मोठ्या कष्टाने मॅनेज केले होते. यानंतरही अकाउंटंटने पैसे घेतले. याप्रकरणी काँग्रेसने यूपी सरकारवर निशाणा साधला आहे.
हे संपूर्ण प्रकरण महाराजगंजच्या फरेंदा तहसीलचं आहे, जिथे पोस्टेड अकाउंटंट त्याच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी लाच घेत होता. यूपी काँग्रेसने या व्हिडिओवरून राज्य सरकारला कोंडीत पकडलं आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना काँग्रेसने लिहिलं की, "हे महाराजगंजचे साहेब आहेत, बघा कशी लाच घेताहेत. धान्य विकून किंवा शेत विकून माणूस त्यांना लाच देण्यासाठी पैसे आणतोय याने त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना फक्त खिसा गरम करण्याची चिंता असते. मात्र, त्यांच्यासोबतच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही यात भूमिका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, भ्रष्टाचार करणारी व्यवस्था किती दिवस चालणार? बाबांची राजवट असेपर्यंत सुधारणा होईल का?"
बृजमनगंज येथील रहिवासी राजन चौरसिया यांनी दीड वर्षांपूर्वी स्टेटस सर्टिफिकेट बनवण्यासाठी फरेंडा तहसीलमध्ये अर्ज केला होता. जेव्हा त्याची फाईल अकाऊंटंटकडे पोहोचली तेव्हा त्याने रिपोर्ट दाखल करण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. राजन तहसीलच्या फेऱ्या मारत राहिले, मात्र त्यांचे स्टेटस सर्टिफिकेट होऊ शकले नाही.
राजनने सांगितलं की, मी अकाऊंटंटला त्याच्या मागणीनुसार अनेक वेळा थोड्या प्रमाणात पैसे दिले. मात्र दरम्यान त्याने आणखी पाच हजार रुपयांची मागणी केली. १५ दिवसांपूर्वी मी माझ्या एका मित्रासह तहसीलला पोहोचलो होतो आणि २९०० रुपये दिले होते. यावेळी राजनच्या सहकाऱ्याने गुपचूप व्हिडीओ बनवला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आरोपी अकाऊंटंट ३० नोव्हेंबरलाच निवृत्त झाला आहे.