सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील नेहरू चौक, जपानी मार्केट परिसरातील फुटपाथवर बाजार भरून नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. महापालिका व पोलीस प्रशासन करवाई करीत नसल्याने, आश्चर्य व्यक्त होत असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
उल्हासनगरासह राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवारी व रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. शासन निर्णयाचे तंतोतंत पालन होण्याचाही जबाबदारी स्थानिक प्रशासन व पोलिसांची आहे. मात्र शासनाच्या नियमाला शहरातील फुटपाथ वरील व्यापाऱ्यांनी हरताळ फासला असून त्यांनी शनिवारी व रविवारी कापड्यासह इतर जीवनावश्यक वस्तूची विक्री रस्त्याच्या फुटपाथवर सर्रासपने सुरू केली. खरेदीसाठी नागरिकानी गर्दी केल्याने, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कोरोना संसर्गाची धडकी भरली. इतर वेळी कारवाई साठीं सज्ज असलेले महापालिका अतिक्रमण पथक, हाकेच्या अंतरावर असलेले उल्हासनगर पोलीस, करवाई का करीत नाही. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला.
गेल्या आठवड्यात कॅम्प नं-३ येथील भंगार गल्लीतील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले अतिक्रमण पथक, प्रभाग अधिकारी व दुकानदार यांच्यात वाद निर्माण होऊन हाणामारी व पोलीस स्टेशन पर्यंत प्रकार गेला होता. मात्र प्रभाग अधिकारी शिंपी यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. अतिक्रमण पथकाचे काम चांगले असताना शनिवारी व रविवारी भरणाऱ्या अश्या अवैध बाजारावर कारवाई का होत नाही. हे कारण गुलदस्त्यात आहे. तसेच बाहेरून शटर बंद आतून दुकान सुरू असा प्रकार शहरात सर्रासपने सुरू असूनही महापालिका व पोलीस काहीएक कारवाई करीत नसल्याने त्यांच्या कर्तव्य बाबत प्रश्नचिन्हे उभे ठाकले. नेहरू चौक, फर्निचर मार्केट, गोलमैदान परिसर, शिरू चौक, जपानी मार्केट, कॅम्प नं-४ व ५ येथील मार्केट मधील दुकाने शटर बंद सुरू असून पोलीस व महापालिका कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे.
अश्या अवैध बाजारावर कारवाई कधी?
नेहरू चौक, फर्निचर मार्केट, शिरू चौक, कॅम्प नं-४ व ५ मधील मुख्य मार्केटच्या रस्त्याच्या फुटपाथवर दुकाने उघडून विविध मालाची विक्री होत आहे. नागरिकही वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस व महापालिकेला याबाबत माहिती होऊनही कारवाई केली जात नाही.