मुंबईपोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात उपनगरातील जोगेश्वरी पोलिस ठाण्यात तैनात असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हेगाराच्या वाढदिवसाच्या दिवशी स्थानिक हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराला केक भरवताना दिसत आहेत. जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेरलेकर यांनी एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पोलीस निरीक्षक महेंद्र नेरलेकर सराईत गुन्हेगारासोबत केक कापताना दिसत आहेत.
संबंधित आरोपीचं नाव दानिश इश्तिखार सय्यद असं आहे. दानिश हा जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीत राहतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दानिशवर गोरेगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307,148, 504 अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्यावर हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सध्या तो जामीनावर आहे.
काही दिवसांपूर्वी दानिशचा जन्मदिवस होता. त्याने वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दानिशच्या घरी गेले होते. त्यांनी दानिशसोबत त्याच्या वाढदिवसाचा केकही कापला. संबंधित घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.