वरठी (भंडारा) : समाज माध्यमावर व्हीडीओ व्हायरल होण्याचा ट्रेंड आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना झपाट्याने बाहेर येत असल्याने अनेक घटनांना वाचा फुटत आहे. अश्या एका व्हीडीओची चर्चा दोन दिवसापासून होत आहे. अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याचा विडिओ आहे. हा व्हीडीओ मोहाडी तालुक्याच्या वरठी परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंडारा व मोहाडी तालुक्यातील अनेक रेतीघाट आहेत. पांढरे सोने म्हणून रेतीचा उल्लेख केला जात असून राजकीय वरदहस्ताने रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. वायरल झालेल्या व्हीडीओ हा दाभा हद्दीत असलेल्या नाका चौकीचा आहे. यात या मार्गावरून जाणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या चालकडून खुलेआम पोलीस कर्मचारी पैसे घेताना दिसत आहेत. प्रत्येक वाहनांना अडवून त्यांच्या कडून रोख देणं घेताना दोन कर्मचारी दिसत आहेत. ते दोन कर्मचारी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वस्तुस्थिती व यात असलेले कर्मचारी याची पुष्टी करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकरणात कोंटीही गय केली जाणार नाही. प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यासाठी अहवाल वरिष्ठाना पाठवण्यात येणार असल्याची माहिती वरठीचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी दिली.