उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशपोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता तृणमूलच्या खासदारांना देखील धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे.हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना सांत्वन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, ममता ठाकुर यांच्यासह इतर नेते गावात पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना गावाच्या सीमेवर रोखले. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी खासदार डेरेक ओ ब्रायन यांना धक्काबुक्की करून बाहेर काढले. दरम्यान, डेरेक ब्रायन हे जमिनीवर खाली कोसळले. तर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अमानुषपणे बाहेर ढकलले. तृणमूल काँग्रेसच्या नेता ममता ठाकुर यांनी सांगितले की, 'उत्तर प्रदेश महिला पोलिसांनी आमच्यासोबत धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांनी आमचे ब्लाउज पकडले, आमच्या खासदारांवर लाठीचार्ज केला आणि जमिनीवर पाडले. पुरूष पोलिसांनी सुद्धा गैरवर्तणूकीने वागले, हा अत्यंत लज्जास्पद प्रकार होता'कालच पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस येथे जात असताना यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं. दरम्यान त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणात आता राहुल गांधींसह 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.