ठाणे - प्रियकरासोबत कट रचून पतीची झोपेच्या गोळ्या आणि विषाचे इंजेक्शन देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने त्याचा अपघात झाल्याचा बनाव रचत रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे त्यांचा हा बनाव उघडकीस आला आणि या दोघांना शिताफीने अटक करण्यात आली. पतीचा मृतदेह स्कूटरवरून रुग्णालयात नेत असतानाची सीसीटीव्ही दृश्य पोलिसांसाठी तपासासाठी महत्वाचा धागादोरा ठरला आहे.
गोपाळ नाईक हे ठाण्यातील गायमुख भागात रहात होते. त्यांची पत्नी प्रिया हिचे महेश कराळे (25) सोबत सोशल मीडियावरुन प्रेमप्रकरण जुळले होते. नंतर या दोघांची मजल अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचली. या दोघांचे व्हिडीओ कॉलवरील संभाषण गोपाळने ऐकलं आणि याबद्दल त्याने प्रियाला जाब विचारला होता. गोपाळ आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येत असल्याचं कळाल्यानंतर प्रियाने महेशच्या मदतीने गोपाळचा काटा काढण्याचं ठरवलं. गोपाळ हा जिम इन्सट्रक्टर होता आणि त्याला ठार मारणं सोपं नाही हे प्रिया आणि महेशला माहित होतं. यावर उपाय म्हणून दोघांनी 29 डिसेंबरला गोपाळला खूप बिअर पाजली. यानंतर प्रियाने गोपाळच्या जेवणात 30 झोपेच्या गोळ्या मिसळल्या. गोपाळ पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याचा जीव घेण्यासाठी प्रियाने महेशच्या मदतीने त्याला विषाचे इंजेक्शन टोचले. महेशने गोपाळच्या डोक्यावर अवजड वस्तूने वार केले आणि नंतर गळा आवळून त्याला ठार मारले. गोपाळच्या हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून दोघांनी गोपाळच्या अपघाताचा बनाव करून त्याचा मृतदेह स्कूटरवरून सिव्हील रुग्णालयात आणला. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत पोलिसांना माहिती देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना डॉक्टरांनी माहिती दिल्याचं कळताच प्रिया आणि महेश तिथून पलायन केले.
कासारवडवली पोलिसांना मृतदेहाची पाहणी केली असता गोपाळच्या शरीरावरील जखमा अपघाताच्या नसल्याचे लक्षात आले. तसेत शवविच्छेदन केल्यानंतर गळा आवळल्याने आणि झोपेच्या गोळ्यांच्या अतिसेवनातून आणि डोक्यावर प्रहार केल्याने गोपाळचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. गोपाळचा मृतदेह सिव्हील रुग्णालयात सोडून प्रिया व महेश माथेरानला पळून गेले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गोपाळची पत्नी प्रिया आणि तिचा प्रियकर महेश कराळे यांना नेरळ येथून अटक केली. पोलिसांनी आरोपींची उलट तपासणी केली असता त्यांनी गोपाळच्या हत्येची कबुली दिली.