वसई - केवळ ६० हजारांसाठी मित्राची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे छिन्न विछिन्न ३०० तुकडे केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. तब्बल तीन दिवस मृतदेहाचे तुकडे करून प्रसाधनगृहातून टाकत विल्हेवाट लावत होता. शौचालयाच्या टाकीत मासांचे तुकडे आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काल विरारच्या बचराज पॅरेडायस या इमारतीच्या शौचालयाच्या टाकीत मानवी देहाचे तुकडे सापडल्याने इमारतीत एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना मासाच्या गोळ्यात ३ हाताची बोटे आढळली होती. पोलिसांनी या इमारतीमधील सी विंगमधील ६०२ क्रमांकाच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे आढळले. ते घर काही दिवसांपूर्वी पिंटू शर्मा (३२) याने भाड्याने घेतले होते. पोलिसांनी पिंटूला ताब्यात घेतले आणि त्याने दिलेल्या माहितीने पोलिसांच्या अंगावरही थरकाप उडाला. हा मृतहेद गणेश कोल्हटकर (५८) या मीरा रोड य़ेथे राहणाऱ्या इसमाचा होता. आरोपी पिंटू याने आर्थिक वादातून त्याची हत्या केली होती.
उपअधीक्षक जयंत बजबळ यांनी माहिती देताना सांगितले की, मृत कोल्हटकर याची आरोपी पिंटू शर्मा बरोबर ६ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. प्रिटिंग प्रेसमध्ये काम करणारा कोल्हटकर याने पिंटू करून १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील १ लाख परत केले होते तर ६० हजार बाकी होते. ते परत न मिळाल्याने त्याने कोल्हटकरची हत्या केली. त्यानुसार आरोपीने विरारमध्ये भाड्याने सदनिका घेतली आणि मृत कोल्हटकरला मद्य पिण्यासाठी बोलावले. तेथे क्षुल्लक वादातून भांडण केले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर सतत तीन दिवस तो त्याच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. त्याने तब्बल ३०० हून अधिक तुकडे केले आणि ते शौचालयातून टाकून दिले. तर मुंडके आणि हड्डी भाईंदरच्या खाडीतून फेकून दिले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी तो सतत तीन दिवस फ्लॅटवर जात होता.
१६ जानेवारी रोजी पिंटूने कोल्हटकरची हत्या केली. सोमवारी इमारतीच्या रहिवाशांना दुर्गंधी आली. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून शौचालयाची टाकी साफ केली. त्यातून सुमारे ४० किलो मास निघाले. परंतु ते नेमके काय आहे ते समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना पाचारण केले. तेव्हा त्या मासांच्या गोळ्यातून तीन बोटे सापडली आणि हत्येचा उलगडा झाला. गणेश बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या बहिणीने नयानगर पोलीस ठाण्यात १५ जानेवारी रोजी दाखल केली होती. गणेश अविवाहीत होता. तो लग्न जुळविण्यासाठी पिंटूच्या संपर्कात होता. आरोपी पिंटू शर्मा याच्यावर यापूर्वी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हत्येच्या दिवशी क्षुल्लक वाद झाल्याने हत्या केल्याचे पिंटू पोलिसांना सांगत असला तरी ही हत्या पुर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारण त्याने काही दिवसांपूर्वीच सदनिका भाड्याने घेतली होती.