हैदराबादच्या एका महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यानंतर महिला अधिकारी ढसाढसा रडली. तेलंगणाच्या आदिवासी कल्याण इंजिनिअरिंग विभागाशी संलग्न असलेल्या एका कार्यकारी इंजिनिअरला सोमवारी 84,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. तक्रारदाराने के जगा ज्योती या कार्यकारी इंजिनिअरवर लाभाच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप केला होता. एसीबीने तातडीने कारवाई करत तिला पैसे घेताना रंगेहाथ पकडलं. लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर ज्योती रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ज्योतीची फिनोलफथेलिन टेस्ट घेण्यात आली, ज्यामध्ये तिच्या उजव्या हाताच्या बोटांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. फिनोलफथेलिनचा उपयोग लाच घेणाऱ्यांना पकडण्यासाठी केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती चिन्हांकित बिले किंवा कागदपत्रे हाताळते तेव्हा सोल्यूशनचे ट्रेस त्याच्या हाताला चिकटतात आणि माइल्ड बेसच्या संपर्कात येताच गुलाबी रंग दिसून येतो.
84 हजार रुपयांची घेतली लाच
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, के जगा ज्योती आपलं काम प्रामाणिकपणे करत नव्हत्या आणि फायदा मिळवण्यासाठी लाच घेत होत्या. महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून तिच्याकडून लाच म्हणून घेतलेले 84 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. ती सध्या पोलीस कोठडीत असून, त्याला आता हैदराबाद न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. NDTV हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.