ठाणे - थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत गुन्हेगारांना विकण्यासाठी तयार केलेला मोठा शस्त्रसाठा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने अमरावती येथून हस्तगत करण्यात आला आहे. अमरावती येथे पथकाने केलेल्या कारवाईत 10 पिस्तुल, 40 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे ठाणे पोलिसांचे मोठे यश आहे. बेकायदा शस्त्रसाठा प्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे.
राज्यातील पिस्तूल सप्लाय करणारी ही टोळी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक मोठ्या व्यक्ती यांच्या टार्गेटवर असल्याचं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. नव वर्षाच्या सुरुवातीला मोठा हल्ला करण्याचा आणि घातपात घडवण्याचा या टोळीचा प्रयत्न असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. ऐन नव्या वर्षात पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. तर इथून मागे झालेल्या हत्या आणि हल्ल्यांशी या टोळीचा काही संबंध आहे का याचाही आता पोलीस तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्या 2 जणांची आता ठाणे पोलीस कसून चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.