नवी दिल्ली : ओव्हरटेक करण्यावरुन बाईकवाल्याचं कारवाल्याशी भर रस्त्यात भांडण झालं. त्याचा राग म्हणून कारचालकानं बाईकस्वाराला उडवलं. मागचा पुढचा विचार न करता बाईकला कट मारुन हा कारवाला पुढे निघून गेला. दिल्लीच्या अरजानगड मेट्रो स्टेशनजवळ एक कारवाला आणि काही बाईकवाला यांच्यात रस्त्यातच बाचाबाची झाली. ओव्हरटेक करण्यावरुन भर रस्त्यात भांडण सुरु झालं. दोन्ही बाजूंनी एकमेकांना शिवीगाळ केली गेली. बाईकस्वार आणि कारवाला रस्त्यातच एकमेकांना भिडले, त्यानंतर कार पुढे निघून जाईल असं वाटत होतं. पण तोच कारवाला भरधाव वेगानं आला आणि बाईकवाल्याला कट मारुन पुढे निघून गेला. कारचा वेग इतका होता की, बाईकवाला दोन-तीन पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला आपटला. हा सगळा व्हिडीओ मागच्या बाईकवाल्यानं शूट केला. DL 12 CR 1293 असा कारचा नंबर आहे, पोलिसांनी स्युमोटो कारवाई करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीस्वार आणि पांढऱ्या स्कॉर्पिओ कारमधील एक व्यक्ती यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होतेआणि अपमानजनक वादविवाद झाल्यानंतर, कारमधील व्यक्तीने दिल्लीतील अर्जन गड मेट्रो स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला असताना दुचाकीस्वाराला धडक दिली. दुचाकीस्वाराच्या मित्राने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा वाद पाहायला मिळतो. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चारचाकीची ओळख पटवली. पीडित दुचाकीस्वाराने आज फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी स्वत:हून कारवाई करत कार मालकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना त्या व्यक्तीने लिहिले की, "स्कॉर्पिओ कार चालकाने आमच्या काही स्वारांना जवळजवळ मारलं आणि आम्हाला कारखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली." ते पुढे म्हणाले, "कोणीही गंभीर जखमी झाले नाही."