नवी दिल्ली - बिहारच्या ट्रेनमध्ये पोलिसांनी दादागिरी केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. भागलपूर-दानापूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये पाच पोलिसांवर एका टीटीईने हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एसी बोगीत तैनात असलेले टीटीई दिनेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इन्स्पेक्टरला फक्त तिकिटाबद्दल विचारले होते, ज्यावर तो संतापला आणि मारहाण करू लागला. यानंतर अन्य चार पोलिसांनीही त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. टीटीई दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, सर्वप्रथम सुनील कुमार यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. काही वेळाने जेव्हा ट्रेन बख्तियारपूर रेल्वे स्टेशनवर आली तेव्हा आणखी काही पोलीस कर्मचारी तेथे आले. तसेच त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. टीटीईने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये अनेक प्रवासी होते, मात्र मदतीसाठी कोणीच पुढे आले नाही. अत्यंत वाईट पद्धतीने ते मारत असल्याचं देखील सांगितलं आहे.
दानापूर-भागलपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये टीटीई दिनेश कुमार सिंह यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी पीडित टीटीईने रेल्वे पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. सोबतच या प्रकरणातील आरोपी पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर आणि इतर पोलिसांच्या वागण्याने प्रवासीही हैराण झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.