कानपूर : गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेश नेहमीच चर्चेत असते. या राज्याचे आमदारच बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असतात. यामुळे पोलीस यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर चर्चेत येते. आज हे पोलीस खाते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. दोन पोलिसांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. यामुळे पोलिसांनी गस्त वाढवली आहे. गस्तीसाठी वाहनेही असतात. या वाहनातील पुढील सीटवर कोण बसणार यावरून दोन पोलिसांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. ही घटना कानपूरमध्ये घडली आहे.
या व्हिडीओमध्ये पोलिसांचे वाहन दिसत आहे. तर रस्त्याच्या कडेला दोन पोलिस गणवेशामध्ये दिसत आहेत. यामध्ये एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला रस्त्याच्या कडेला नेत मारहाण केली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनातून हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. शेवटी या पोलिसांची मारामारी तिसरा पोलीस येऊन सोडविताना दिसत आहे.
मारहाणीमध्ये व्यस्त असलेल्या पोलिसांची ओळख पटली असून कॉन्स्टेबल राजेश सिंग, सुनिल कुमार अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या पोलिसाचे नाव समजलेले नाही. पोलिसांकडे इनोव्हा कार आहे. हे तिन्ही कॉन्स्टेबल यावेळी ड्यूटीवर होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार कारमध्ये दोघांमध्ये पुढे कोण बसणार यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोघांनीही एकाचवेळी पुढील सीटवर बसण्याचा प्रयत्न केला. यामुळे ढकलाढकली झाली आणि प्रकरण हातघाईवर गेले.
लाच घेण्यावरूनही भिडले होते...उत्तरप्रदेश पोलिसांमध्येच हाणामारीची ही काही पहिली घटना नाही. लाच घेण्यावरूनही दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाली होती. त्यांना नंतर निलंबित करण्यात आले होते.